Header Ads Widget

ध्यान कसे करावे : How to do meditation in Marathi?

मित्रानो ध्यानामुळे जीवनाला नवीन दिशा मिळते.

आज आपण पाहणार आहोत ध्यानाचे काही प्रचलित प्रकार आणि आपण ध्यान कशाप्रकारे करायला हवे?

How to do meditation in Marathi?
How to do meditation in Marathi?


अ) झेन ध्यान (Zen Meditation)

   झेन हे 'ध्यान' ह्या  संस्कृत शब्दाचं जपानी रूपांतर होय. भारतातून चीन व नंतर चीनमार्गेहे 'ध्यान' जपानमध्ये जाऊन लोकप्रिय झालं. साधेपणानं निसर्गाशी मैत्री करून राहायचं हे या ध्यानाचं वैशिष्ट्य! 

    या ध्यानात श्वासावर लक्ष देत मनात येणार्‍या विचारांकडे साक्षीभावाने पाहून ध्यान केलं जात... या ध्यानात मनात काही प्रश्न उपस्थित केले जातात. उदाहरणार्थ माझ्या जन्मापूर्वी मी कोण होतो?  माझे अस्तित्व काय होते!  अशा प्रश्नांवर लक्ष केंद्रित करून मन तर्काच्या पलीकडे जाऊन विचार करू लागतं व त्यातून जो शब्दात न सांगता येण्यासारखा अनुभव येतो त्याला जपानमध्ये 'सटोरी' म्हणतात... जसे गूळ गोड आहे असे शब्दात सांगता येते; पण गोड म्हणजे काय?  हे खाल्ल्याशिवाय कळत नाही... तसेच आपल्या देहाची जाणीव, सावधपणा शब्दातीत होऊ लागला की हे  'झेन ध्यान' जमायला लागलं असं म्हणा हवं तर... सत्य, साक्षात्कार हा असाच शब्दातीत असतो. तो शब्दात बांधता येत नाही, पकडता येत नाही...

   डॉक्टर जेम्स आँस्टिन या अमेरिकेतील मेंदूतज्ञाने या ध्यानाचे शरीरावर व मेंदूवर होणारे परिणाम आपल्या Zen and the Brain - Toward an understanding of meditation and conciousness पुस्तकात लिहिले... येणाऱ्या अनुभवांचे वैज्ञानिक भाषेत केलेले विवेचन जपानमध्ये सर्वांना भावले....

    झेन ध्यानात स्वतःच्या चे देहाविषयीचे भान नाहीसे होते... निसर्ग, सोबतचा परिसर, दृश्यापासून आपण स्वतःला वेगळे करू शकत नाही. पाहणार आणि पाहिला  जाणारा यांच्यामधले अंतर नाहीस होतं... काळाचं भान नाहीसं होतं... कर्तेपणाचा अहंकार नाहीसा होतो... या अनुभवाला डॉक्टर ऑस्टिन यांनी ऑब्जेक्टिव रियालिटी असं नाव दिलं... असे अनुभव भारतातील अनेक संतश्रेष्ठांच्या वर्णन केले आहेत... 

    आपण व्यवहारात सावध असतांना सहजतेने काही गोष्टी करीत असतो. उदाहरणार्थ गर्दीतून कौशल्यपूर्वक वाट काढीत गाडी चालवणारा ड्रायव्हर, इंजेक्शन देणारा डॉक्टर, ड्रिल मशीन भिंतीला भाग पाडणारा वायरमन, सुईत दोरा ओवणारा शिंपी या प्रकारे कामे करताना जो सावधपणा किंवा सजगता असते ती आत्मकेंद्रित असते याउलट आपण एखादे दृश्य देहभान हरपून पाहत असू की ज्या सजगतेत आपण नवीन काहीतरी ग्रहण करतो, सृजनशीलतेला प्रोत्साहित करतो असा अनुभव येतो की जो परकेंद्रित असतो. या दोन्ही प्रकारच्या सजगतेत मेंदूतील मार्ग वेगवेगळे असतात. पहिल्या आत्मकेंद्रित अशा सावधपणात मेंदूतील जे भाग कार्यरत असतात ते दुसऱ्या परकेंद्रित अशा सावधपणा कार्यरत नसतात. डॉक्टर आँस्टिन यांच्या मते जैन हे दोन्ही प्रकारच्या सावधपणात द्यावयाचे प्रशिक्षण आहे. या ध्यानात स्वकेंद्रित नसलेली Allocentric अशी सजगता जास्त वेळ अनुभवयाची असते व यांचा वारंवार सराव केला की आत्मकेंद्रीत सजगपणा हळूहळू विसरून जायला लागतो साक्षात्काराचा, सत्याचा अनुभव येऊ लागतो...

     ध्यानामुळे आलेले अनुभव हे अगदी कमी काळ टिकतात कारण अहंकाराच्या प्रवेशामुळे ते जास्त काळ टिकत नाहीत... तरीदेखील हा अनुभव आल्यानंतर माणूस शांत व आनंदी राहू लागतो... माणूस नम्र, निगर्वी, निस्वार्थी होऊ लागतो...

  ब) करुणाध्यान : 

   निरपेक्ष प्रेम आणि करुणा या भावना मनात जागृत करून हे ध्यान केलं जातं. या प्रकारच्या ध्यानात सर्वांचे कल्याण होवो, मंगल होवो असे भाव मनी आणावे लागतात.

    करुणा ध्यानाचा सराव केल्याने मेंदूचा Prefrontal Cortex हा भाग सक्रीय होऊन ग्यामा लहरी मेंदूत वाहू लागतात असं संशोधन डॉक्टर रिचर्ड यांनी केले. वर्षानुवर्षे ध्यान करणाऱ्या जुन्या साधकांत हाय फ्रिक्वेन्सी असणाऱ्या अधिक सुसंगत आणि सुसंघटित अशा ग्यामा लहरी आढळून येतात...

     हे दोन प्रकारांनी करता येते... पहिल्या प्रकारात एखाद्या लक्ष्यावर उदाहरणार्थ एखाद्या झाडाचा शेंडा, एखादा बिंदू, एखाद्या आवाजावर मन वारंवार केंद्रित करून ध्यान केले जाते... तर दुसऱ्या प्रकारात कुठेही लक्ष केंद्रित न करता साक्षीभावाने, त्रयस्थपणे केवळ श्वासावर लक्ष ठेऊन मनात येणाऱ्या विचारांना कोणतीही कोणतीही प्रतिक्रिया न देता ध्यान केले जातं...

     वर्षानुवर्षे असा ध्यानाचा अभ्यास केल्याने पंचज्ञानेंद्रियांनी गोळा केलेली माहिती येथे संकलित होते असा मेंदूचा Thalamus नावाचा भाग अधिक सक्रिय झालेला दिसून येतो. नंतर ही माहिती थँलँमस कडून प्रतिक्रिया देण्यासाठी मेंदूच्या कॉर्टेक्स या भागाकडे पाठवली जाते... जुन्या साधकांच्या मेंदूतील थँलँमस हा भाग त्यामुळेच तर वाढलेला दिसून येतो! आणि गंमत म्हणजे जुन्या साधकांच्या मेंदूत ध्यानाच्या अवस्थेत नसताना देखील परायटल लोब हा भाग सक्रिय झाल्याचे दिसू लागले. ध्यानाच्या अभ्यासाने 'मी' पणा कमी होऊन दुसऱ्याला समजून घेणे शक्यसाध्य झाल्यानेच हा बदल घडून येत असावा! 

     वर्षानुवर्षे रोज नियमित ध्यान केल्याने मेंदूत होणाऱ्या बदलांपैकी Prefrontal cortex  हा भाग सक्रिय होत असल्याचे दिसून आले आणि जेव्हा सक्रिय असतो तेव्हा माणूस 'आनंदी' असतो हे सिद्ध झाले आहे... त्यामुळे मनुष्य आनंदीच नाही तर समतोल वृत्तीत राहू लागतो... त्यामुळे माणसाची ग्रहणक्षमता व स्मरणशक्‍ती वाढते...

      मानसिक तणाव आल्यामुळे जी हार्मोन्स शरीरात पाझरतात. त्यामुळे ग्रहणक्षमता आणि स्मरणशक्ती कमी होत जाते हे येथे लक्षात घेणं गरजेचं ठरतं... त्यामुळे आजूबाजूची परिस्थिती व घटना यामध्ये जो ताण आहे त्या ताणावर प्रतिक्रिया देऊन तणाव निर्माण करायचा की नाही ते आता आपण ठरवायचं...

     मेंदूतील सेरेटोनीन नावाचा स्त्राव कमी झाला की निराशा, उदासीनता येऊ लागते. मानसरोगतज्ञ जी औषधे देतात त्यांनी हा स्त्राव वाढून काही काळ रुग्णांना बरे वाटते. परंतु ही महागडी औषधे, मानसरोगतज्ञांच्या वाऱ्या करण्यापेक्षा करुणाध्यान करून मनात राग, द्वेष, निराशेऐवजी प्रेम, करूणा, आनंद इत्यादी भाव निर्माण केले तर मेंदूतील रसायने बदलतात. मेंदूचा Prefrontal Cortex हा भाग कार्यरत होऊन सिरेटोनीन नावाचा स्त्राव वाढून मनाला बरं वाटतं...

  आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपला मेंदू काही वाईट घटना, दुःखद प्रसंग चांगले लक्षात ठेवतो कारण उत्क्रांतीच्या काळात माणसाची जडणघडण होतांना संकटकाळात पलायन करायचे असते,भीती ह्या संवेदनेतून स्वतःचे संरक्षण होते हे मेंदूच्या Amygdala व Hippocammpus  या भागात कायमचे ठसल्यामुळे पुढे जसजशा पिढ्या उत्क्रांत होत गेल्या तरी वाघ, सिंहासारख्या हिंस्र श्वापदांच्या आवाजाने माणूस पळत सुटतो... पण अशी झालेली मेंदूची जडणघडण सध्याच्या विज्ञानयुगात माणसाची डोकेदुखी ठरली आहे. यामुळेच माणूस जास्त निराश, उदास होतो आहे. कटुता, वाद, भांडणतंटा, संघर्ष ह्या गोष्टी त्याच्या मेंदूतून तो डिलीट करू शकत नाही...सुख, आनंद, शांती, समाधान ह्या गोष्टी स्वतःच ध्यानाने मिळवायच्या आहेत, मिळवता येतात हे माहिती असून देखील तो दारोदार सुखाचा शोध घेत भटकतो आहे... सुखाचे, आनंदाचे क्षण तो पटकन विसरून जात आहे.

   करुणाध्यान करताना पहिल्या टप्प्यात एका जागी शांत बसून, डोळे अलगद मिटून श्वास घेत, मी निरोगी आहे, मी निर्भय आहे, मी आनंदी आहे अशा संकल्पनांचे जागरण करून श्वास सावकाश सोडून द्यायचा, चेहर्‍यावर प्रसन्न भान ठेवायचे असा सराव करावा लागतो... दुसऱ्या टप्प्यात मनात करूणा, प्रेम, आनंद अशा भावना आणून सर्वांचे कल्याण होवो, मंगल होवो, सर्वांचं भलं होवो असे संकल्प करून सर्वच प्राणीमात्रांविषयी करूणा घेऊन ध्यान करावं लागतं....

  क) कल्पनाध्यान: 

  ध्यानामुळे अनेक रुग्णांचे रक्तदाब नियंत्रणात येऊ लागले.अल्सर, निद्रानाश, त्वचारोग, डोकेदुखी, हृदयरोग इत्यादी रोगात रुग्णांना आराम पडू लागला तसे ध्यानविरोधी लोक ध्यानविरुद्ध डांगोरा पिटू लागले की हा केवळ 'प्लासेबो इफेक्ट' आहे. पेशंटच्या मनातील श्रद्धा व निष्ठभाव जागृत झाल्याने त्यांना बरे वाटते; ध्यानामुळे नाही अशी ओरड सुरू झाली...

    आता ध्यानावर संशोधन करणं गरजेचं होतं... कारण 'ध्यान' हाच मनोकायिक विकारातून आराम देणारा उपाय आहे हे सप्रमाण सिद्ध करायचं होतं. मग डॉक्टरांच्या देखरेखीखाली ध्यानापूर्वी व नंतर रुग्णांचे ब्लड प्रेशर तपासून त्यांच्या सकाळ,सायंकाळच्या नोंदी ठेवून शास्त्रोक्त अभ्यासाला सुरुवात झाली. व्यसन सोडण्यासाठी देखील ध्यानाचा उपयोग होऊ लागला... अतिउच्च रक्तदाबामुळे नंतर पॅरालिसिस, किडनीचे विकार, हृदय विकार इत्यादी दुष्परिणाम टाळता येणं शक्य दिसू लागलं. 

    हिमालयातील बौद्ध भिक्षू थंडीच्या दिवसात ओलं वस्त्र अंगावर घेऊन उघड्याने थंडीत ध्यानाला बसू शकतात? आणि ध्यान संपल्यानंतर त्यांच्या अंगावरचे वस्त्र कोरडं होतं हे कसं होतं? सामान्य माणूस जर असं काही करु लागला तर तो थंडीने कुडकुडून बेशुद्ध पडेल पण बौद्ध भिक्षूंना यातलं काहीच होत नाही... याचं कारण हे भिक्षु ध्यानस्थिती धारण केल्यावर शरीरात सर्वत्र अग्नी पेटला आहे अशी कल्पना करतात व हा अग्नि शरीर व मनातील सर्व अशुद्धी, घाण जाळून टाकतो अशी त्यांनी धारणा केल्याने त्यांच्या शरीरातील तापमान कमी न होता उलट वाढते व या वाढत्या उष्णतेमुळेच त्यांच्या अंगावरचे वस्त्र कोरडं होतं...

    आपणसुद्धा असं ध्यान करू शकतो... एखादं निसर्गरम्य दृश्य काळे ढग, सुर्योदय, पौर्णिमेचा चंद्र, घनदाट जंगल,उंच उंच हिमशिखरे, खोल खोल दऱ्या, समुद्रकिनारा, समुद्राच्या फेसाळत्या लाटा, शांत सरोवर, सरोवरात फुललेली कमळं, समुद्रात असणाऱ्या होड्या, वरून खाली कोसळणाऱा धबधबा इत्यादी गोष्टींचे ध्यान करून आपल्या मनाला प्रसन्न, शांत, स्थिर, आनंदी ठेवू शकतो. डॉक्टर बेन्सन यांच्या मते काहीवेळा प्रत्यक्ष संकट किंवा संघर्षाची स्थिती नसताना देखील केवळ येणाऱ्या संकटाची कल्पना केल्‍याने देखील शरीरात युद्धसदृश अँड्रेनालीन नावाचं रसायन स्त्रवतं व फाईट व फ्लाईट रिफ्लेक्सचा परिणाम म्हणून रक्तदाब वाढतो... हृदयाची धडधड वाढते, श्वासाची गती वाढते, स्नायूंवरील ताण वाढतो, शरीर थकून जातं, मन अस्वस्थ होतं. याचा अर्थ आपल्याला संघर्षमय किंवा संकटाची कल्पना करून चालणार नाही... कारण आपल्याला शरीरात शांतता प्रस्थापित करायची कि आणीबाणी हे आपण ठरवायचं !

     एखादी कृती करताना आपल्या मेंदूत जे मार्ग, ज्या पेशी सक्रिय होतात, ते मार्ग, त्यापेशी केवळ त्या कृतीची कल्पना केल्‍याने देखील सक्रिय होतात. जेव्हा आपण एखादी कल्पना करतो किंवा एखादे दृश्य डोळ्यासमोर आणतो तेव्हा मेंदूतील Post Parietal cortex  हा भाग कार्यरत होतो व ज्ञानेंद्रियांकडून माहिती घेऊन त्यानुसार आवश्यक रूपरेषा तयार करून त्यानुसार मेंदूत बदल होऊ लागतात... अशा रीतीने कर्करोग झालेल्या, अर्धांगवायू झालेल्या, हृदयविकार झालेल्या रुग्णांना कल्पना ध्यानाने त्या त्या अवयवांची शक्ती वाढवून रुग्णांचा आत्मविश्वास वाढू लागतो. कल्पना करून ते दृश्य डोळ्यासमोर उभे केल्याने मेंदूचा त्या कृतीशी संबंधित भाग विकसित होतो हे सिद्ध झाले आहे... खेळातसुद्धा दबावाखाली असणाऱ्या, मानसिक खच्चीकरण झालेल्या खेळाडूंना त्यांच्या गत  आयुष्यातील विजयाचे प्रसंग सीडीद्वारे दाखवून नंतर कल्पना ध्यानाने त्या कृतीशी निगडीत मेंदूच्या भागाचा विकास केला जातो अशी स्मृती मेंदूत तयार होत जाते... संघासोबत असणारे मानसरोगतज्ञ, कोच, कॉर्पोरेट ट्रेनर ह्या गोष्टींचाच वापर करून संघाला हवे ते यश मिळवून देतात.

    'ध्यान' नावाची शक्ती शरीरातील क्रिया बदलून टाकते. शिवाय 'ध्यान' हे कोणत्याही साधनांशिवाय करता येते. सर्वसामान्यांना करता येते. खरोखरीच डॉक्टर बेन्सन यांचे संशोधन एक मैलाचा दगड ठरला आहे...

 ड) डॉक्टर डीन ऑर्निश यांचे ध्यान:

     अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन यांचे डॉक्टर व आरोग्यविषयक सल्लागार डॉक्टर डीन ऑर्निश यांनी हृदयरोगाचे समूळ उच्चाटन करण्याकिरता एक नियोजनबध्द कार्यक्रम हाती घेतला. त्याचे नाव होते,  'प्रोग्रँम फॉर रिव्हर्सिंग हार्ट डिसीज्' याचा अर्थच असा की हृदयरोगावर औषधे, शस्त्रक्रिया इत्यादी करून हृदय चांगले ठेवता येत नाही. त्यासाठी योग्य असा आहार, रोज हृदयाची ठोके वाढविणारा तीस ते चाळीस मिनिटांचा व्यायाम व मन:शांतीसाठी ध्यान हे तितकेच महत्त्वाचे असल्याचे संशोधन डॉक्टर डीन ऑर्निश यांनी केले.

      डॉक्टर आर्निश यांनी दोन प्रकारचे ध्यान सुचवले -

      1)Directed Visualization Meditation.

      2)Receptive Visualization Meditation.

      पहिल्या प्रकारात डोळे बंद करून, शांतपणे एका जागी स्वस्थ बसून, जीभ न हलविता जसे दृश्य आपण कल्पनेने पाहू तसाच परिणाम शरीरात दिसू लागतो... उदाहरणार्थ आधी रुग्णांना त्यांनी एका रसाळ लिंबाचे ध्यान करायला सांगून या लिंबाची फोड आता तोंडात धरल्यावर, भरपूर लाळ उत्पन्न होत आहे. अशी कल्पना करावयास सांगितली आणि लोकांना खरंच तसं वाटलं. काही रुग्णांना आधी हृदयाचे चित्र दाखवून नंतर ध्यानात ते डोळ्यासमोर आणून हृदयाचा रक्तपुरवठा वाढतो आहे असे कल्पनाध्यान करायला लावले तर काही रुग्णांचा केवळ कल्पनेने हाताकडचा रक्तपुरवठा वाढल्याचे त्यांना दिसून आले. आपण जसे कल्पनादृश्य मनात  आणू तसाच हृदयावर परिणाम होत जातो हे त्यांनी सप्रमाण सिद्ध केले. आपण घाबरविणार्या भीतीदायक प्रसंगाचे दृश्य डोळ्यासमोर आणले तर हृदयाचा रक्तपुरवठा कमी होतो व शरीरात संघर्षाची स्थिती निर्माण होते. आपण एखाद्या आनंददायी प्रसंगाला डोळ्यासमोर उभे केले तर शरीरात आनंद, शांती व समाधान निर्माण होते, मनावरचा ताण कमी होतो... हृदयरोगी व्यक्तींनी ध्यान करताना माझ्या हृदयाच्या रक्तवाहिन्यातील अडथळे कमी होत आहेत किंवा एक पांढर्‍या रंगाचा प्रकाश माझ्या श्वासातून फुफ्फुसात व नंतर हृदयाच्या रक्तवाहिन्यात जाऊन मधे मधे निर्माण झालेले अडथळे जाळून टाकत आहे व आपल्या उच्छवातून ती घाण शरीराच्या बाहेर टाकली जात आहे असे ध्यान केल्यास खरोखर त्यांच्या हृदयाच्या रक्तवाहिनीतील अडथळे कमी झाल्याचे दिसून येऊ लागले.

      दुसऱ्या प्रकारच्या ध्यानात योगाभ्यासातील शवासन किंवा योगनिद्रा स्थितीत जाऊन डोळे दगडासारखे करून, डोळ्यांची बुबुळे न हलविता, जीभ दगडासारखी करून जीभ न हलवता सर्व शरीरातील स्नायू शिथिल करून आपण एखाद्या निसर्गरम्य शांत परिसरात आहोत अशी कल्पना करून तिथे असणाऱ्या पक्ष्यांच्या आवाजाची कल्पना करून, पूर्णपणे त्या दृश्याशी समरस होऊन देहभान विसरावे लागते. शरीर निर्जीव, निश्चेष्ट, निर्विचार, निर्विकल्प करावे लागते. अशा प्रकारचे योगनिद्रा बिहार स्कूल ऑफ योगाचे स्वामी सत्यानंद सरस्वती यांनी लोकप्रिय केली... अर्धा तास ते 40 मिनिटांच्या विश्रांतीनंतर दोन ते तीन तास गाढ झोप घेतल्यासारखी विश्रांती मिळते असे दिसून आले... काही वेळा काही प्रश्न हृदयालाच विचारून त्याप्रमाणे अंतर्मनाशी संवाद साधून आपणच आपल्या रुदयाभोवती उभ्या केलेल्या भिंती, बुरूज पाडून आपल्या हृदयाशी संवाद साधावा लागतो... अशा प्रकारच्या कल्पनाध्यानाने येणाऱे रुग्णांचे अनुभव डॉक्टर आर्निश यांनी आपल्या 'रिव्हर्सिंग हार्ट डिसीज्' या पुस्तकात वर्णन केले आहेत... या पुस्तकात खुल्या मनाने, खुल्या दिलाने व आनंदाने जगण्याचा सल्ला ते देतात. त्यांच्याच भाषेत सांगायचं तर  "Open your heart to yourself, Open your heart to otherselves & open your heart to highself" अशा सुचना अंतर्मनाला देऊन भावनांच्या खेळापासून दूर होत, स्वत:च स्वता:च्या हृदयाशी संवाद सुरू करायचा. मनात येणाऱ्या भावना, वासना, चिंता, भीती यांना नाकारता समजून घ्यायचा व चांगले मनमोकळे मित्र जोडायचे, लोकांशी सुसंवाद साधायचा, दुसऱ्यांना समजून घ्यायचे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपला अहंकार बाजूला ठेवून, 'मी' पणा कमी करून ज्या सृष्टीने, निसर्गाने, ईश्वराने आपल्याला जन्म दिला त्यांच्याप्रती अर्पणभाव, कृतज्ञता व्यक्त करायची. कॅलिफोर्निया विद्यापीठातील एका गंमतीदार संशोधनात तर अहंकारी, मोठमोठ्या बाता मारणार्‍या व्यक्तींना हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता जास्तीची असल्याचे दिसून आले आहे. डॉक्टर डीन आँर्निश यांच्या मते एकटे राहणारे, एकाकी पडलेल्या व्यक्ती जास्त अहंकारी व रागीट असतात. अर्थातच या तापट स्वभावामुळे हृदयरोगाची शक्यता वाढते हे सांगणे नलगे!  यासाठी डॉक्टर आँर्निश महात्मा गांधींच्या प्रार्थना आणि बुद्धांच्या करुणाध्यानाचा पुरस्कार करतात.

     हृदयरोग बरा होतो यापेक्षा तो का होतो? याच्या मुळाशी जाऊन संशोधन करणाऱ्या डॉक्टर ऑर्निश यांनी शस्त्रक्रिया  हा हृदयरोगावरचा उपाय पटत नाही... जीवनशैलीतील बदलानेच आणि हृदयरोग बरा होतो अशी त्यांची धारणा आहे... यासाठी ध्यानाचा अभ्यास महत्त्वाचा ठरतो. हा म्हातारपण लांबवतो, प्रतिकारशक्ती वाढवतो, जीवनशक्ती वाढवतो, आपल्या प्रत्येक पेशीपर्यंत ध्यानाचा परिणाम जाऊन पोहोचतो !

(ध्यान कसे करावे : How to do meditation in Marathi?)

 इ) स्वामी सत्यानंद सरस्वतींची योगनिद्रा:

 हठ्योगप्रदीपिकेत योगनिद्रेचा उल्लेख आला असला तरी खऱ्या अर्थाने ती प्रकाशझोतात आणली ती बिहार स्कूल ऑफ योगाच्या स्वामी सत्यानंद सरस्वती यांनी...

  पाठीवर शांतपणे झोपून हात व पाय शरीरापासून बाजूला करून पायाचा अंगठा, बोटे, घोटे, पाय, मांड्या, खुबा असे एक एक अवयव डोळ्यांसमोर आणत मन त्या अवयवांवर केंद्रित करून श्वास घेताना पोट फुगवून व श्‍वास सोडताना पोट आत घेत सर्व शरीर शिथिल सोडून पडून राहायचे... न झोपता, सावध राहात शरीर शिथील करण्याचा एकेक टप्पा पूर्ण झाला म्हणजेच योगशास्त्राच्या परिभाषेत न्यास केला की दुसऱ्या टप्प्यात कल्पनाध्यान सुरू करायचे... कल्पना ध्यानात आपले मन शरीरातून बाहेर आणून प्रेतासारख्या निर्जीव जमिनीवर पडलेल्या आपल्या शरीराकडे पाहत आपले शरीर कापसासारखे हलके झाले आहे किंवा लोखंडासारखे जड झाले आहे, बर्फासारखे थंड किंवा विस्तवातल्या निखाऱ्यासारखे गरम झाले आहे. अशा परस्परविरोधी कल्पना करून नंतर दृश्ये पहायला सुरुवात करायची...

    समुद्रकिनारा, समुद्राच्या फेसाळणार्‍या आवाज करीत येणाऱ्या वेगाने येणार्‍या लाटा, काळेनिळे ढग असणारे आकाश, पौर्णिमेचा चंद्र, चांदण्या, शांत सरोवरात फुललेली कमळं इ. प्रकारच्या कल्पनाध्यानाने मन निर्विचार होऊ लागतं, शांत होऊ लागतं... या स्थितीतून शेवटचा अंतिम व महत्त्वाचा टप्पा म्हणजे स्वयंसूचना देऊन मी निरोगी आहे, मी निर्भय आहे, मी आनंदी आहे अशा संकल्पनाच जागरण शरीरातील प्रत्येक अणूरेणू, रक्ताचा थेंब न् थेंब शरीरातील प्रत्येक पेशीपर्यंत करायचं नंतर सावकाश आपल्या शरीरातील प्रत्येक अवयवात स्वयंसूचना देत जाणीव, जिवंतपणा आणून एका कुशीवर वळून उठून बसायचे !

     स्वामी सत्यानंद सरस्वती या योगनिद्रेचे 9 भाग करतात... अंतर्मुख होणे, संकल्प, न्यास, श्वासाकडे लक्ष, सावधानता, परस्परविरोधी कल्पना, दृश्यमालिकांच्या कल्पना, स्वयंसूचना आणि बहिर्मुख होणे. आपल्या जाणीवेच्या सर्वसाधारण तीन अवस्था असतात असे स्वामीजी सांगतात शांत झोप स्वप्न असलेली झोप जागृत अवस्था तीन अवस्था असतात असे स्वामीजी सांगतात - 1) शांत झोप 2) स्वप्न असलेली झोप  3) जागृत अवस्था. या अवस्थेत शरीर जागृत अवस्थेत असून देखील शरीराला विश्रांती मिळते. शरीराला विश्रांती म्हणजेच मेंदू व मनालाही विश्रांती मिळते. या निद्रेत सहजपणे जागृत रहात विश्रांती मिळते. मुद्दाम कष्ट करावे लागत नाही... प्रयत्न करावे लागत नाहीत... या योगनिद्रेमुळे चंचलता नाहीशी होते... रक्तदाब कमी होते, निद्रानाशाचा विकार नाहीसा होतो... अस्वस्थता कमी होते, तापटपणा कमी होतो, मधुमेह, कॅन्सर हृदयरोग्यांना आराम वाटतो, ताणतणाव कमी होऊन नैराश्य, OCD यासारखे मनोविकार कमी होतात.


 ई) विपश्यना:

     हा जागृत ध्यानाचा प्रकार असून गौतम बुद्धांनी असे ध्यान केल्याचे उल्लेख आढळतात. कोणतीही प्रतिक्रिया न देता स्वतःच्या श्वासाकडे आणि शरीरातील अंतरंगातील घडामोडींकडे सावधपणे पाहात जे जागरूक ध्यान केले जाते. त्याला 'विपश्यनाध्यान' असे म्हणतात... भारतात स्वामी सत्यनारायण गोयंका यांनी हा ध्यानाचा प्रचार आणि प्रसार केला. हे सावध किंवा सजग ध्यानाच आहे...

     विपश्यना ध्यानात श्वासावर संपूर्ण लक्ष केंद्रित करून शरीरात निर्माण होणाऱ्या सुखद किंवा दुःखद संवेदनांकडे साक्षीभावाने पहायचा सराव करावा लागतो. या संवेदनांना प्रतिक्रिया द्यायची नाही... कारण कोणतीही संवेदना कायमस्वरूपी टिकत नाही ती सदैव बदलत असते. अर्थातच इतर ध्यानाच्या प्रकारांप्रमाणे इथेही सावधानता व समतोल महत्त्वाचा ठरतो !

     ध्यानाची मूळ उद्देश आत्मभान वाढविणे हा आहे. पूजा- अर्चा करुन, वंदन करून आत्मभान वाढणार नाही. ध्यान हाच आत्मभाव वाढविण्याचा एकमेव मार्ग आहे. परंतु ह्या साठी वेळ काढावा लागतो. एकांतात हे ध्यान चांगले होते... जॉन काबात झीन यांनी  MBSR या कोर्समध्ये जे सावध किंवा सजगध्यान सांगितलं, काहीसं तसंच हे ध्यान आहे... विपश्यना ध्यान शिबिरात पहिले तीन दिवस श्वासावर लक्ष ठेऊन ध्यान करावयास सांगतात. पुढचे तीन दिवस शरीरातील संवेदना समजून प्रतिक्रिया न देता ध्यान करण्याविषयीचे प्रशिक्षण दिले जाते तर शेवटचे तीन दिवस करुणा ध्यानाचे सर्वांचे कल्याण होवो, मंगल होवो असे भाव मनी आणून ध्यान करायला शिकवले जाते...

      अशा रीतीने गौतम बुद्धांनी सांगितलेले हे विपश्यना ध्यान आज कोणत्याही धर्मातल्या, पंथातल्या माणसाला करता येते !